किरण असती बाहू माझे, काहीही न व्यर्थ जात...
१३ मे २०१३ साली "कमळ पाहिले मी राया" हा अभंग ऐकला. तेव्हा जे मनात उमटल ते पुढील लेखात आहे. आज तब्बल १२ वर्षांनी देखील हा अभंग आणि त्या अभंगावर मनात उमटलेले विचार तसेच आहेत. आज हा अभंग अधिक जवळचा वाटतो. जॉर्ज कार्व्हर अगदी यांची जीवनगाथा बाजूला ठेवून स्वतःच्या जीवनात जेव्हा हा अभंग पडताळून पाहते तेव्हा देखिल हाच विचार प्रवाहित होतो...की
किरण असती बाहू माझे, काहीही ना व्यर्थ जात..
Waste is only Tragedy
आयुष्यातील काही मोलाची वर्षे फुकट गेली का? असा मनात प्रश्न उभा राहत असताना सदगुरुकडून उत्तर मिळते...खात्री मिळते...किरण असती बाहू माझे काहीही ना व्यर्थ जात
"जन्म माझा व्यर्थ ना हो मृत्यू लागो सार्थकी" ही प्रार्थना आद्यपिपादादांनी शिकविली. पण हा जन्म आणि हा मृत्यू केवळ एकाच वेळेचा आहे का?
माझा रोजचा होणारा जन्म आणि माझा रोजचा होणारा मृत्यू देखील सार्थकी लागला पाहीजे. माझ्या आयुष्यात येणारे विविध मृत्यू जसे किर्ती-अपकिर्तीचा मृत्यू, कर्तुत्वाचा मृत्यू, अपेक्षा-आशा-निराशा मृत्यू, अशा कोणत्याही प्रकारचे मृत्यू आणि त्या अनुषंगाने होणारे नविन जन्म हे देखिल सार्थकी लाव हीच प्रार्थना सद्गुरु चरणी आहे.
>>>
किरण असती बाहू माझे, काहीही न व्यर्थ जात....
कमळ पाहिले मी राया..कमळ पाहिले मी...
गुरुवारी हा अभंग ऐकला आणि मन अजूनही ह्या अभंगाच्याच अवती-भोवती घुटमळतेय. ह्या अभंगाचि जादू अशीच आहे. मात्र, ह्या अभंगाचा इफेक्ट इतके दिवस टिकून राहण्यास कारणीभूत ठरलेली अजून एक व्यक्ती...जॉर्ज वॉशिंटन कार्व्हर..
यास योगायोग म्हणा किंवा आणखी काहीही...परंतु ह्या अभंगाचा भावार्थ, अर्थ, मतितार्थ मला कळावा म्हणूनच की काय गुरुवारीच बापूंनी माझ्याकडून "एक होता कर्व्हर" हे पुस्तक वाचून पूर्ण करुन घेतले. मंगळवारी रात्री पुस्तक हातात मिळाल्यानंतर दोन दिवसात झपाटल्यासारखं वाचून काढले. तसे हे पुस्तक मी दुसर्यांदा वाचत होते पाच सहा वर्षांपूर्वी जेव्हा मी हे पुस्तक वाचले होते...तेव्हाची अधीरता आणि उत्साह आजही वाचताना होता. त्यावेळी ह्या पुस्तकाने अर्थात कार्व्हर यांच्या चरित्राने जसे अंतर्मूख केले होते तसेच आजही केले...फक्त यावेळी साथ मिळाली ती आद्यपिपादादांच्या "कमळ पाहिले मी रे राया" या अभंगाची.
डॉ. कार्व्हर यांच्या चरित्राने मला कमळ पाहिले राया हा अभंग समजण्याची बुद्धी मिळाली...तर अभंग काय सांगतो हे अनुभवण्यची सुसंधी कार्व्हर यांच्या चरित्रातून मिळाली. अंबज्ञ.
खरचं,
कमळ पाहिले मी राया....कमळ पाहिले मी...॥धृ॥
काय त्याची सुंदरता....काय त्याचा थाट...
चिखलामधूनी वर येऊनी...झळके दिमाखात राया...झळके दिमाखात ॥१॥
गुलामगिरीच्या चिखलातूनवर आलेल्या कार्व्हर यांच्या जीवन कमळाने सार्या जगाला उजळून टाकले. अठराविश्व दारिद्र्य, गुलामगिरीचे ओझे, आईपासून कायमचा विरह, कृष कुपोषित शरिर असलेला ज्याचे नाव ही स्वतःचे नाही...कुळ नाही...पूर्वजांचा पत्ता नाही असे हे "मेरीचे पोर" परमेश्वरावरील असीम निष्ठेने व स्वकष्टाने चिखलातून वर आले आणि दिमाखात झळकले.
मोझेस कार्व्हर या जर्मन शेतकर्याने मेरीला गुलाम म्हणून विकत घेतले. पुढे गुलाम पळविणार्या टोळीने मेरीला पळवून नेले व तिचे दोन महिन्याचे पोर पोरके झाले. मात्र कार्व्हर व त्याची पत्नी सूझन ह्यांनी या मरणोन्मुख पोराचा नीट सांभाळ करुन वाढविला. त्यांनीच त्याची विनम्र आणि प्रामाणिक वृत्ती पाहून जॉर्ज असे नामकरण केले. कार्व्हर कुटुंबियांचेच नाव त्याने लावले.
निसर्गाच्या सानिध्यात रमणे, झाडा-फुलांबरोबर खेळणे, बागकाम करणे हेच काय ते जॉर्ज करीत असे. हा छोटा जॉर्ज म्हणजे छोटा माळी झाला होता. अंगाने कृश, दुबळा, नाजूक होता. मात्र त्याच्या हातात विलक्षण कसब होते. चुली लिंपणं, लोकर पिंजणे, कातडी कमावणं, मेणबत्या बनविणे, मसाले तयार करणे, पाव-बिस्कीट तयार करणे, विणकाम करणे, चित्रकला, असं सगळ सगळ तो लहानपणीच करायला शिकला होता.
त्याला खूप शिकायचे होते आणि आपल्या बांधवातून या गुलामगिरिच्या चिखलातून बाहेर काढायचे होते. हे एकच ध्येय त्याचे होते आणि म्हणूनच चित्रकार किंवा म्युझिशियन न होता तो एक कृषिशास्त्रज्ञ झाला.
दहा वर्षाचा असताना त्याने शिक्षणासाठी कार्व्हर यांच्या घरच्या सुरक्षित वातावरणातून अज्ञात असुरक्षित अशा जगात पाऊल टाकले. काबाडकष्टकरुन शिक्षणासाठी पैसा गोळा केला. कित्येक दिवस उपासमारिला सामोरे गेला. शिक्षणाचा खर्च वाढला की काबाडकष्ट ही वाढले. या दरम्यान लावणी, पेरणी, लॉंड्री अशी बरीच कामे तो शिकला. त्याने कोणाकडूनही कधीच काहीही फुकट घेतले नाही. जो त्याला मदत करी त्याच्या घरी जाऊन तो त्याचे घरकाम, बागकाम करीत असे. पुढे तो तोतरा बोलणारा मुलगा उत्तमरित्या गाणे ही गाऊ लागला.
अशी उत्तरोत्तर प्रगती करीत त्याने अवघ्या जगावर आपली प्रभा पसरली. काय नाही केले ह्या कार्व्हरने...अगदी सगळ काही...एका तपस्वी सारखे आपले आयुष्य मानवजातीच्या कल्याणासाठी व्यतित केले.
आपण केलेल्या प्रयोगांवर संशोधनावर कधीच पेटंट घेतले नाही. मुक्त मनाने आणि मुक्त हस्ताने ज्ञानदान केले. पुढे जसे झाडांवर उपचार करणारा डॉक्टर, हा जनावरांचा आणि माणसांचाही डॉक्टर झाला. तेही कोणतेही विधीवत प्रशिक्षण न घेता. त्यांना लोकांनी डॉक्टर ही पदवी दिली. त्यानंतर कित्येक वर्षांनी त्यांना डॉक्टरेट मिळाली होती.
मधमाशी नेई मध...कधी नारीच्या केसात..
कधी सुकूनी उन्हात...कमळ झाकळत राया....कमळ झाकळत ॥२॥
खरंच कमळाचा वापर ज्या मुक्तपणे होतो तशाच मुक्तपणे विविध मार्गांनी कार्व्हर यांचा उपयोग समस्त काळ्या गोर्या समाजाला झाला. कधी कुणी त्यांच्याकडे मोठ मोठ्या संशोधनासाठी ऑफर घेऊन येई तर कधी एखादा सामान्य शेतकरी आपल्या शेतातील साधीशी अडचण घेऊन येई. दोन्ही परिस्थीतीत कार्व्हर तितक्यात तन्मयतेने उपयोगी राहिले. याबदल्यात त्यांनी घेतले काय? तर काहीच नाही....साध्या दुवा किंवा आर्शीवादाची देखील अपेक्षा नाही...देवाचे कार्य म्हणून करीत गेले...कमळ म्हणून वर आले आणि कमळ बनूनी राहिले...
कित्येकदा कष्टाच्या उन्हात सुकून झाकळले...कधीच स्वतःचा विचार केला नाही...त्यांनी केलेल्या कष्टाचा आणि सहन केलेल्या हालआपेष्टांचा आपण विचार ही करु शकत नाही. त्यांच्या वाटेला "काळा" म्हणून शेवटपर्यंत येत राहीलेली हिनतापूर्वक वागणूक पाहून या अभंगाच्या पुढील चरण आठवते...
इतुके कष्ट केले त्याने, पंकातून दूर गेला
मग व्यर्थ का रे सारे, जीव दुर्दैवात राया...जीव दुर्दैवात...॥३॥
मला असे वाटते हा प्रश्न आद्यपिपा बापूंना विचारत आहे. किंवा आपल्या मनात सहज प्रश्न उमटतो की इतके कष्ट केले तरी शेवटी काय मिळाले, एखाद्या चांगल्या गोष्टीसाठी झटलो पण शेवटी मी दुर्दैवातच असा प्रश्न पडतो. आणि इथेच परमेश्वरावरील विश्वासाला हादरे बसू लागतात. आपल्यासाठी आद्यपिपादादा बापूंना हा प्रश्न विचारत आहे...आणि या प्रश्नाचे खरे समाधान पुढील चरणात बापू करीत आहे असे दिसते...
कार्व्हरच्या बाबतित तेच झाले...वरकरणी पाहता त्यांचे आयुष्य इतरांना दुर्दैवी वाटले, त्यांची दया आली..कुणी त्यांची कीव केली... पण या सार्याकडे त्यांनी दुर्लक्ष केले...जणू काही त्यांना माहित होते...
पिप्या ऐक माशी तृप्त, सौंदर्याचा गुण सत्व
किरण असती बाहू माझे, काहीही न व्यर्थ जात...काहीही न व्यर्थ जा...॥४॥
त्यांच्या कार्यामुळे त्यांनी अनेकांना तृप्त केले होते...समाधान दिले होते..स्वतःतर कमळ बनले पण अनेकांना देखील कमळ बनण्याची प्रेरणा दिली...
त्यांच्यासाठी परमेश्वराचे बाहू किरण होऊन पसरले...सार्या जगावर...
त्यांचा हातगुण, त्यांचे कार्य किरणांप्रमाणे परमेश्वरांच्या बाहूंनी जगभर पसरविले...
कारण लहानपणापासून त्यांचा एका गोष्टीवर ठाम विश्वास होता....
काहीही न व्यर्थ जात.....
त्यांनी घेतलेल्या पहिल्या श्वासापासून ते शेवटच्या श्वासापर्यंत काहीही व्यर्थ गेले नाही. अगदी भौतिक गोष्टीत त्यांच्याकडे टाकाऊ असे काहीच नव्हते. टाकाऊ पासून त्यांनी अनेक टीकाऊ गोष्टी बनविल्या....आपले आयुष्य ही आणि इतरांचे ही...
आद्यपिपादादांच्या या अभंगाचे रसरशीत उदाहरण माझ्यासमोर आले...ही बापूरायांची असीम कृपा...
आणि मी सहज म्हणते...सगळं व्यर्थ आहे...
या अभंगाद्वारे आद्यपिपांनी खरच डोळे उघडले आहेत...
या अनिरुद्धासारखा सद्गुरु माझ्या बरोबर असताना माझा देखील श्वास व्यर्थ नाही जाणार...कारण याचे बाहू किरण आहेत...
खरं तर या अभंगाचा भावार्थ कीती खोल असेल माहित नाही...पण वरवर का असेना जे मला समजले, जसे समजले ते लिहल्यापासून राहावले नाही...
कारण
किरण असती बाहू माझे....
काहीही न व्यर्थ जात....
ह्या ओळी म्हणजे माझाही जीवंत अनुभव आहे. कार्व्हर या शास्त्रज्ञापासून ते माझ्यासारख्या सामान्य भक्ताच्या आयुष्याला हा आद्यपिपांचा अभंग व्यापून टाकतो. हीच या अभंगाची खासियत आहे. आयुष्य असावे कसे तर कमळासारखे...खरंच बापू आयुष्य असावे तर या कमळासारखे...आणि खरंच बापूंवर प्रेम करणार्या प्रत्येकाचे आय़ुष्याचे कमळ होणारच..
कारण प्रत्येकजण ह्या कलियुगातील विविध प्रकारच्या चिखलातून सूर्यरुपी बापूंच्या ओढीनेवर आलेला आहे...
चिखलात लोळणार्या सुकराचे देखील कमळ करण्याचे सामर्थ्य या माझ्या सदगुरु अनिरुद्धात आहे, हे कदापि विसरुन चालणार नाही.
- रेश्मावीरा नारखेडे
टिप्पण्या