द सिक्रेट ऑफ शिलेदार - पाहण्यासारखी वेबसिरीज
तुम्हाला जर रहस्यपट पाहण्यास आवडत असतील आणि तुम्ही इंडियाना जोन्स सारखे चित्रपटांचे फैन असाल तर शिवकालीन इतिहासावर बेतलेला "द सिक्रेट ऑफ शिलेदार" ही वेबसिरीज पाहण्यास तुम्हाला मजा येईल.
कोणाचीही तुलना न करता ही वेबसिरीज पाहिली तर सर्वच पैलूनी ही उजवी ठरते. तसेच छत्रपती शिवाजी महाराज व त्यांचे शिलेदार यांच्या रहस्य रंजक कथेवर आधारित ही वेबसिरीज असल्याने एक वेगळीच ऊर्जा तुम्हाला मिळून जाते.
द सिक्रेट ऑफ द शिलेदार’ ही वेब सिरीज ३१ जानेवारी २०२५ रोजी डिस्नी+ हॉटस्टारवर प्रदर्शित झाली. ही सिरीज डॉ. प्रकाश कोयाडे यांच्या ‘प्रतिपश्चंद्र’ या मराठी कादंबरीवर आधारित आहे. दिग्दर्शक आदित्य सरपोतदार यांनी इतिहास, साहस आणि कल्पनारम्यतेचा मिलाफ करून एक मनोरंजक कथा साकारली आहे.
कथेचा केंद्रबिंदू आहे डॉ. रवी (राजीव खंडेलवाल), जो इतिहासाचा उत्साही विद्यार्थी आहे. त्याला एका न्यायाधीशाकडून आपल्या पालकांच्या मृत्यूचे रहस्य आणि ‘शिलेदार’ या गुप्त समाजाबद्दल माहिती मिळते.
शिलेदार हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या खजिन्याचे रक्षण करणारे योद्धे आहेत. रवी आपल्या भावासह (गौरव अमलानी) आणि प्रियल (सई ताम्हणकर) यांच्या साथीने या खजिन्याचा शोध घेण्यास निघतो. त्यांच्या मार्गात राज्यपाल रामचंद्रन (कनन अरुणाचलम) आणि त्याचे गुंड अडथळे निर्माण करतात.
राजीव खंडेलवाल यांनी डॉ. रवीची भूमिका संयमाने साकारली आहे. सई ताम्हणकर यांनी आपल्या दुहेरी भूमिकेत चांगली कामगिरी केली आहे. गौरव अमलानी यांनी कथेला हलकेपणा आणि विनोदाची छटा दिली आहे. आशिष विद्यार्थी यांनी आपल्या भूमिकेत चांगला ठसा उमटवला आहे.
लेफ्ट राईट लेफ्टमध्ये झळकलेला राजीव खंडेलवाल या भूमिकेसाठी चपखल बसला असे मला वाटले. पण त्याच शिलेदार असण हे त्याला उलघडत जाण्याची प्रक्रिया घाईत झाली अस वाटल. तो स्वतः एक शिलेदार आहे हे उलघडल्यावर जे सरप्राईज, कुतुहूल किंवा बुचकळ्यात टाकणारा मोमेंट तितका पोहचला नाही.बाकी त्याला मिळणारी उत्तरे सहज मिळाल्यासारखी वाटली थोडा अजून संघर्ष दिसण्यास हवा होता.
तरीही, यात इतिहास आणि कल्पनारम्यतेचा उत्तम मिलाफ आहे. चांगली पात्रांची बांधणी आणि त्यांचे अभिनय उत्तम आहेत. आणि मुख्य दम रहस्यमयतेने भरलेल्या कथेतच आहे. याचे bgm देखील साजेसे आहे.
आणि शेवट तर चित्तथरारक आहे. एक दोन मोमेंट असे आहेत की अंगावर शहरा येतो आणि क्षणभर आपणही महाराजांचे शिलेदार आहोत असा फिल येतो.
इतिहासाचा वापर उत्कृष्ट केलेला आहे.
शेवट अगदी कल्पनेच्या पलीकडला आहे. पण शेवट पाहिल्यानंतर त्याचे क्ल्यूज आधी सोडले गेले आहेत हे समजते.
शेवटी मनात एका प्रश्न उपस्थित होतो की खरच आपल्याला सगळा इतिहास माहीत आहे का? किती तरी गोष्टी या अजूनही उलघडल्या नसाव्यात. सद्गुरू श्री अनिरुद्धांच्या अग्रलेख मालिका वाचणाऱ्यांना हे अगदी पटेल. इतिहास हिमनगाच्या खालच्या टोका सारखा आहे. किती खोल आहे हे मोजता येत नाही.
असो, द सिक्रेट ऑफ द शिलेदार’ ही सिरीज साहस आणि इतिहासाची आवड असलेल्या प्रेक्षकांसाठी एक चांगला पर्याय आहे. अत्यधिक हिंसा किंवा अश्लीलतेशिवाय, ही सिरीज कुटुंबासह पाहण्यासाठी योग्य आहे. जर तुम्हाला खजिना शोधण्याच्या कथा आवडत असतील, तर ही सिरीज नक्कीच पाहा. आणि आपल्या मुलांना नक्की दाखवा. आणि जर तुम्ही पाहिली असेल किंवा पाहिल्यावर खाली पोस्ट वर कमेंट करून नक्की कळवा.
छत्रपती शिवाजी महाराजांचा खरा खजिना कोणता? ह्याचे मिळालेले उत्तर जबरदस्त आहे.
@thinkbigreshma | - रेश्मा नारखेडे
टिप्पण्या