​रोनाल्डो, पोर्तुगाल आणि टीमवर्कचा खरा धडा

मी काही फुटबॉल लवर नाही पण मला मेस्सी आणि रोनाल्डो दोघांचेही गेम आवडतात. त्यातील सगळं समजत असंही नाही. मुलांमुळे थोडफार समजते. 

पोर्तुगाल आणि काँगोचा सामना पाहिला. त्यावरील अनेक व्हिडिओ आणि विविध मतप्रवाहही वाचले. त्या सगळ्यातून एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली.

अतिशय महान आणि जागतिक स्तरावर स्वतःची वेगळी ओळख निर्माण केलेल्या रोनाल्डोसारख्या खेळाडूला त्याच्याच संघाने काही प्रमाणात एकटे पाडल्याचे चित्र अनेकांना दिसले. आश्चर्याची गोष्ट म्हणजे असे करूनही संघाने काही विशेष यश मिळवले नाही; सामना अखेरीस बरोबरीत सुटला. पण सामन्यापेक्षा जास्त चर्चा झाली ती पोर्तुगाल संघाच्या खेळातील समन्वय आणि वर्तनाची.

या विषयावर दोन्ही बाजूंची मते आहेत. काही जण म्हणतात की संघ कोणत्याही एका खेळाडूपेक्षा मोठा असतो, तर काहींना वाटते की रोनाल्डोसारख्या अनुभवी आणि निर्णायक खेळाडूला दुर्लक्षित करणे ही मोठी चूक ठरली. सत्य कदाचित या दोन्ही मतांच्यामध्ये कुठेतरी असेल.

पण या प्रसंगातून एक महत्त्वाचा धडा नक्की मिळतो. प्रत्येक खेळाडू स्वतःसाठी नव्हे, तर आपल्या संघासाठी आणि देशासाठी खेळत असतो.

रोनाल्डो हा महान खेळाडू आहे. मैदानावर एका क्षणात सामना फिरवण्याची क्षमता त्याच्यात आजही आहे. अशा खेळाडूकडे योग्य वेळी बॉल न जाणे किंवा त्याच्या क्षमतेचा पूर्ण वापर न होणे, हे कोणत्याही संघाला महागात पडू शकते. मात्र हा लेख रोनाल्डोबद्दल नाही; हा लेख टीमवर्कबद्दल आहे.

इतिहास साक्षी आहे की ज्या संघांमध्ये वैयक्तिक महत्त्वाकांक्षा संघाच्या उद्दिष्टांपेक्षा मोठी होते, त्या संघांचे यश फार काळ टिकत नाही. प्रत्येक संघात एक स्टार परफॉर्मर असतो आणि प्रत्येकाला स्टार बनायचेही असते. काहींना संधी मिळते, काहींना मिळत नाही. काहींची क्षमता एका क्षेत्रात असते, तर काहींची दुसऱ्या क्षेत्रात.

पण यशस्वी संघाची ओळख वेगळी असते.

तिथे प्रश्न “स्टार कोण?” हा नसतो. प्रश्न असतो, “संघाचे उद्दिष्ट काय?” आणि “ते साध्य करण्यासाठी कोणत्या व्यक्तीकडे कोणती क्षमता आहे?”

जो संघ आपल्या सदस्यांच्या सामर्थ्याची योग्य ओळख ठेवतो आणि त्यांचा योग्य वापर करतो, तोच खऱ्या अर्थाने यशस्वी ठरतो.आणि त्याचाच जर रिझल्ट पहायचा असेल तर मेस्सीचे तीन गोल होणे.  हे गणित चुकले की सगळेच चुकते. 

म्हणूनच मला नेहमी श्रीरामांच्या संघटनेचा आदर्श वाटतो.

कारण त्या सेनेतही हनुमंतांसारखा अतुलनीय स्टार परफॉर्मर होता. समुद्र ओलांडण्यापासून ते लंका दहन आणि संजीवनी आणण्यापर्यंत अनेक अशक्य वाटणारी कार्ये त्याने केली. तरीही संपूर्ण युद्धकथा कधीच फक्त हनुमंताभोवती फिरले नाही.

श्रीरामांना माहीत होते की विजय हा एका व्यक्तीच्या सामर्थ्याने नाही, तर प्रत्येकाच्या सामर्थ्याचा योग्य उपयोग करून मिळतो.

म्हणूनच नल-नीलांना सेतू बांधण्याची जबाबदारी मिळाली. जांबुवंतांनी अनुभव आणि मार्गदर्शन दिले. अंगदाने दूताची भूमिका निभावली. सुग्रीवाने सेना एकत्र ठेवली. अगदी खारीच्या छोट्याशा योगदानालाही श्रीरामांनी मान दिला.

विशेष म्हणजे हनुमंतांनी स्वतःच्या सामर्थ्याचा कधी अहंकार केला नाही आणि इतरांच्या योगदानाला कधी कमी लेखले नाही. आणि दास असणाऱ्या हनुमंताकडून असे होणेही शक्य नाही. पण आपण याकड़े एक गुण म्हणून पाहण्यास हवे. रामायणातील प्रत्येक प्रसंग एक महत्त्वाचा धडा शिकवतो. 

एखाद्या टीममध्ये स्टार परफॉर्मर असणे गरजेचे असते, पण त्या स्टारची क्षमता ओळखणे, त्याचा योग्य उपयोग करणे आणि त्याच वेळी इतरांच्या योगदानाचाही सन्मान राखणे हे त्याहून अधिक गरजेचे असते.

आज अनेक टीम्स, संस्था आणि संघटनांमध्ये समस्या कौशल्याच्या अभावामुळे निर्माण होत नाहीत. त्या निर्माण होतात अहंकारामुळे, स्पर्धेमुळे, न्युनगंडामुळे, असुरक्षितेमुळे आणि “मी” मोठा की “तो” मोठा या विचारांमुळे.

जेव्हा टीमचे ध्येयच मागे पडते आणि वैयक्तिक महत्त्वाकांक्षा पुढे येते, तेव्हा पराभवाची सुरुवात होते.

श्रीरामांच्या वानरसेनेत मात्र एक वेगळीच गोष्ट होती. तिथे प्रत्येकाला स्वतःची क्षमता माहीत होती, पण त्याहून महत्त्वाचे म्हणजे प्रत्येकाला ध्येय स्वतःपेक्षा मोठे वाटत होते.

म्हणूनच ती सेना विजयी झाली आणि अशी रामाचीच सेना विजयी होते. 

खेळ असो, कार्यालय असो, समाजकार्य असो किंवा जीवन यश हे एका व्यक्तीचे नसते. ते अनेकांच्या सामर्थ्यांना एका ध्येयासाठी जोडण्याच्या क्षमतेचे फळ असते.

आणि कदाचित म्हणूनच आजही हजारो वर्षांनंतर श्रीरामांची वानरसेना ही टीमवर्कचे सर्वोत्तम उदाहरण मानले जाते.

कारण तिथे प्रत्येकाला स्टार बनायचे नव्हते; तिथे प्रत्येकाला रामकार्यात योगदान द्यायचे होते 

- रेश्मा नारखेडे

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लघुरूप

Melody Itani chocolaty kyun Hai? The Branding Lesson Behind Melodi