लघुरूप
जस जस सुरसा बदनु बढावा ।
तासु दून कपि रूप देखावा ।
सत जोजन तेहि आनन कीन्हा
अति लघु रूप पवनसुत लिन्हा ।।११।।
सुंदरकांडमधील ही ओवी आपल्याला हनुमंताचे लघुरूप दाखवते आणि खूप मोठी शिकवण देते. ती काय तर…
सुरसेसारखे मोठे संकट समोर असताना किंवा चॅलेंज समोर असताना फार मोठ्या युक्तीने हनुमंत लघुरूप धारण करतात आणि समोरील संकट व चॅलेंज पूर्ण करतात. ह्या एका कृतीने हनुमान बाप्पा आपल्याला लघुरूप घेण्यास शिकवितात, तेही कधी तर संकट काळामध्ये….
साधी गोष्ट असते, महिनाअखेरीस जेव्हा तंगी असते तेव्हा आपोआप खर्च कमी होतात, काटकसर होते आणि पुढचा पगार येईपर्यंत तग धरला जातो.
भारताचे माननीय पंतप्रधानांनी नुकत्याच केलेल्या घोषणा आणि दिलेला काटकसरीचा सल्ला मला असाच लघुरूप घेण्याकडे इशारा करत आहे असे वाटते.
युद्ध अटळ आहे आणि भयावह आहे. आपण थेट प्रत्यक्ष युद्धात नसलो तरी त्याची झळ पोहोचणारच. पण तरीही ती कमीत कमी पोहोचावी यासाठी प्रयत्नशील असणे फार गरजेचे आहे आणि यासाठी नागरिकांनी आधीपासून स्वतःवर बंधने घालणे, अर्थात लघुरूप धारण करणे आवश्यक आहे.
मोदीजींनी मांडलेला मुद्दा हा आयात, परकीय चलनाचा साठा, रुपयाची घसरण, तुटवड्यामुळे वाढू शकणारी महागाई यांच्याशी संबंधित आहे असे वाटते. जितके आपण आत्मनिर्भर असू तितका त्रास कमी होईल. स्वदेशी गोष्टी वापरणे आणि स्वदेशी कंपन्यांना पाठबळ देणे हे आपल्यासाठी, पर्यायाने देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी फार महत्त्वाचे ठरणार आहे. याहून अधिक पैलू असू शकतील. या विषयातील तज्ञ ते उलगडतीलही… पण मध्यमवर्गीय सामान्य माणूस म्हणून जरा लघुरूप धारण केले तर ते आपल्याच फायद्याचे ठरणार आहे.
बाकी कुणाला शिव्या देऊन, त्रागा करून किंवा धरणे धरून हाती काहीच येणार नाही. कारण जे होणार आहे ते होणारच आहे. आपण सजग, जागरूक राहून काळाला अनुकूल राहून वागल्यास ह्याही काळातून सुखरूप बाहेर पडू. कारण Survival is the fittest, not the Best.
आपले नशीब चांगले म्हणून आपल्या पंतप्रधानांनी कोणत्याही दबावाला बळी न पडता ही सूचना आपल्याला दिली आणि आपण सावध होऊन वेळीच जागरूक होऊ. बाकी ज्याचे त्याचे विचार आणि समज. प्रत्येकाला आपापल्या परीने घटनांवर व्यक्त होण्याचा अधिकार आहेच.
सूचनांबद्दल बोलायचे तर सोने खरेदी करण्याची आपली ऐपत नाही. तेलाचा वापर आधीच डायटिंगमुळे कमीच आहे. पब्लिक ट्रान्सपोर्टच वापरतो. दोन पायांची गाडी मजबूत आहे. फॉरेन ब्रँडचा शौक नाही, लोकल काहीही चालते. इथे घर ते ऑफिस याबाहेर कुठेही जाण्यास वेळ नाही. त्यामुळे फॉरेन ट्रिपचा प्रश्नच नाही. तर मोदीजींनी सांगितलेल्या सूचना आम्ही ऑलरेडी पाळतोय. 😄
त्यामुळे तूर्तास तरी टेन्शन नाही.
पण सुज्ञास सांगावे लागत नाही.
देश मजबूत करायचा असेल तर देशासाठी मजबूतपणे उभे राहावे लागते…
माझे सद्गुरू श्री अनिरुद्ध बापूंनी त्यांच्या तिसऱ्या महायुद्धाच्या पुस्तकातून युद्ध कसे असते, काय काय होते आणि आपण कसे असावे, काय करावे हे स्पष्ट सांगितलेले असल्याने या अशा सूचना आणि परिस्थितीसाठी माझी मनोभूमी तयार आहे आणि या अनिश्चित वातावरणात आपण सद्सद्विवेकबुद्धीचा वापर करून स्वतः Survival Mode मध्ये जाणे गरजेचे आहे.
-रेश्मा नारखेडे
टिप्पण्या